खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
भरधाव इनोव्हा कारने चार ते पाच दुचाकींना धडक दिल्याची घटना सांगली शहरात आज सायंकाळी घडली. गणपती पेठ ते टिळक चौक या गजबजलेल्या मार्गावर भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा कारने दुचाकीस्वारांना तसेच पादचाऱ्यांना दिलेल्या जोरदार धडकेत दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
इनोव्हा कार अत्यंत वेगात होती. गणपती पेठ परिसरात पहिली धडक दिल्यानंतर चालकाने गाडी न थांबवता पुढे टिळक चौकाच्या दिशेने धाव घेतली. या दरम्यान तीन ते चार दुचाकींचा कारने चक्काचूर केला.
टिळक चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाच इनोव्हा कार त्या गर्दीत घुसली. काही पादचारी आणि दुचाकीस्वार भरधाव वेगामुळे जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने इनोव्हा चालकाला पकडून बेदम चोप दिला. यानंतर जमावाने कारची तोडफोड केली. या तोडफोडीत इनोव्हा गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचीही चौकशी केली जात आहे.

