खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली- मिरज- कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचाराचे काम का करत नाहीस या कारणावरून काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्याची घटना पंचशीलनगरमध्ये घडली. या प्रकरणी तक्रारदाराच्या तक्रारीवरून तीन कार्यकर्त्यांविरूध्द संजयनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीतील प्रभाग ११ मध्ये काँग्रेसचे उमेदवार आणि खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे उमेदवार मनोज सरगर यांच्यात दुरंगी व चुरशीची लढत होत आहे. या प्रभागातील काँग्रेस कार्यकर्ते आनंदा लिगाडे यांनी भाजप उमेदवार सरगर यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी लिगाडे यांना काँंग्रेसचे काम करू नकोस, तर भाजप उमेदवाराचे काम कर असे सांगितले.
मात्र, लिगाडे यांनी त्यास नकार देत मी काँग्रेसचेच काम करणार असे सांगितले. यामुळे तीन कार्यकर्त्यांनी लिगाडे यांना लाथाबुक्क्यानी मारहाण करून शिवीगाळ केली. भांडणे सोडविण्यास पत्नी आली असता त्यांनाही मारहाण व दमदाटी केली आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार लिगाडेे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. या मारहाणीत भ्रमणध्वनीही फुटला असून नुकसान झाले आहे.

