खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज शहरातील माजी आमदार स्व. डॉ. एन. आर. फाटक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन प्रभाग क्रमांक ४ ड मध्ये अपक्ष उमेदवार डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या अधिकृत प्रचाराचा जोरदार शुभारंभ झाला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अमननगर येथील सुफी संत सय्यद शहा ख्वाजा हुसैनी चिस्ती निजामी दर्ग्याचे दर्शन घेण्यात आले. ही प्रचार फेरी मिरज मार्केट परिसरातून सुरू होऊन विद्यामंदिर शाळा परिसर, अंबाबाई मंदिर दर्शन, ब्राह्मणपुरी ते दत्त चौक या मार्गावरून काढण्यात आली.
या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला भगिनी आणि नागरिक सहभागी झाले होते. संपूर्ण परिसरात डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी त्यांच्या अधिकृत निवडणूक चिन्ह ‘लिफाफा’ या चिन्हावर बटण दाबून विजयी करण्याच्या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी नागरिकांना संबोधित करताना डॉ. महेश कुमार कांबळे म्हणाले की, “गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून नागरिकांनी हुकूमशाही सहन केली आहे. ही लढाई प्रस्थापित नगरसेवक आणि सर्वसामान्य जनतेतील उमेदवार यांच्यातील आहे. सर्व जाती-धर्मातील सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मला निवडून दिल्यास नागरिकांना नगरसेवकांच्या दारात जाण्याची गरज भासणार नाही; मी स्वतः त्यांच्या दारात जाऊन काम करून देईन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

