खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
कुपवाड शहरातील समस्यांबाबत आता मतदार मोठ्या आवाजात आरोप करू लागले आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपचे उमेदवार माजी नगरसेवक प्रकाश ढंग यांच्या बाबतीत मोठी नाराजी आहे. प्रकाश ढंग यांच्यासोबत भाजप पॅनल मध्ये असलेल्या उमेदवारांना आता नागरिकांसमोर जाताना मोठा रोष पत्करावा लागत आहे.
प्रभाग क्रमांक २ मधून एस.सी महिला आरक्षित गटात खरी चुरस आहे. यामध्ये होणारी लढत पाहण्यासारखी असल्यामुळे सर्वच नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
महायुती व महाविकास आघाडीत मोठी लढाई या प्रभागात पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे नेते शेडजी मोहिते यांच्या पत्नी ह्या राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. तर भाजपा नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या सनी धोत्रे यांच्या पत्नी प्राजक्ता धोत्रे या भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून शिवसेना महानगर प्रमुखपदी असलेले ज्येष्ठ नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या पत्नी माजी नगरसेविका अनिता वनखंडे या मैदानात उतरल्या आहेत.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये एस.सी महिला आरक्षित गटात आता खऱ्या अर्थाने मोठी लढाई दिसून येत आहे. सविता मोहिते, प्राजक्ता धोतरे,अनिता वनखंडे या दिग्गज व तगड्या उमेदवारांमुळे चांगलाच खेळ रंगणार असल्याने याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे.
वाघमोडे नगर, कुपवाड शहरातील काही भागात, दुर्गा नगर, विद्यानगर परिसर व इतर काही भागांत शिवसेनेच्या अनिता वनखंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांना मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

