खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दि. ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महापालिका प्रचार प्रभारी मकरंद देशपांडे यांनी बुधवारी दिली.
श्री. देशपांडे म्हणाले, महापालिका निवडणुक भाजप मित्र पक्षांच्या मदतीने ताकदीने लढवत असून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नाराजांची संख्या अधिक असणे स्वाभाविकच आहे. पक्षाचे नेते नाराज कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचे काम करत असून सर्वजण पक्षाच्या प्रचारात सक्रिय होतील असा विश्वास वाटतो. अर्ज दाखल करणार्यांची संख्याही खूप आहे. मात्र, आज होणारी उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर नाराजांची भेट घेउन त्यांचा गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न केले जातील. उमेदवारी माघारीची मुदत २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस ३ जानेवारी रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भव्य प्रचारसभेचे आयोजन करण्यात येत आहे. उमेदवारी यादी जाहीर होत असताना भाजपचा मित्र पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्तीला देण्यात आलेल्या जागेबाबत काही गैरसमज निर्माण झाले आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडण्यात आलेल्या चार जागासाठी भाजपकडूनही एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर याच जागेसाठी जनसुराज्य पक्षानेही एबी फॉर्म दिले आहेत. दोन्ही उमेदवारांची नावे भाजपच्या प्रदेश समितीकडे पाठविण्यात आली असून याबाबतचा अंतिम निर्णय प्रदेश स्तरावरच घेतला जाणार आहे.
दरम्यान, याबाबत जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी सांगितले, आम्ही महायुतीकडे सहा जागांची मागणी केली होती. चार जागा आम्हाला सोडण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. यानुसार चार जागावर आमच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आता या बाबत भाजपच्या वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय होणे अपेक्षित असून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आम्हाला आशा आहे.

