खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ७८ पैकी ३३ जागा लढवत असून अन्य ठिकाणी शाहू, फुले, आंबेडकर विचारांना मानणार्या उमेदवारांना मदत करणार असल्याचे पक्षाचे समन्वयक माजी खासदार संजयकाका पाटील व शहर जिल्हाध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
महायुतीसोबत आमचा पक्ष सत्तेत असला तरी स्थानिक पातळीवरील स्थिती लक्षात स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून कोणत्याही स्थितीत आमचा पक्ष महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकेल आणि आमच्याविना कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही असा विश्वास उभयतांनी यावेळी व्यक्त केला.
महायुतीमधून बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगत ते म्हणााले, आम्ही महायुतीमध्ये जागांची मागणी करणारा प्रस्तावच दिलेला नव्हता. यामुळे चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या जागा आम्हाला जिंकण्याची खात्री वाटते त्याच जागावर आम्ही निवडणूक लढवत असल्याचे ते म्हणाले. जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेसशी चर्चा झाली असल्याचा इन्कार करत आम्ही स्वबळावर ३३ जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. ज्या जागावर आमचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते पुरोगामी विचारांच्या उमेदवारांना मदत करतील असेही त्यांनी सांगितले.
आमच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असा दावा करत असताना सत्ता स्थापनेवेळी कुणाला मदत करणार असे विचारले असता याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हेच याबाबत निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. पक्षाच्या प्रचार शुभारंभ शनिवार दि. ३ जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अंतर्गत तडजोड झाली असून यानुसार जागा वाटप करण्यात आले आहे. या तडजोडीनुसार काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार यांच्या महाविकास आघाडीकडून ५६ जागा लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष लढवत असलेल्या २२ जागांवर उमेदवारच दिले नाहीत. तथापि, ११ जागांवर महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होत आहेत.

