खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने महायुतीचे जागा वाटप जाहीर होण्याची अधिक प्रतिक्षा न करता उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे जिल्हा प्रमुख बजरंग पाटील यांनी सांगितले.
निवडणूक स्वबळावर लढवायची की कुणाशी आघाडी करायची याबाबत वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावर निश्चित होईल असे त्यांनी सांगितले.
भाजपकडून जागा वाटपाबाबत होत असलेली दिरंगाई, शिवसेनेच्या जागांबाबत मौन आणि विशिष्ठ उमेदवाराबाबत भाजप नेत्यांकडून घेतले जात असणारे आक्षेप यावर बैठकीत चर्चा झाली.
भाजपाकडून सन्मान जनक जागावाटप होत नसल्यामुळे आणि काही जागेवर वाद असल्यामुळे अजून सुद्धा जागा वाटपाचा निर्णय झाला नाही. त्यामुळे आता शिंदेच्या शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर स्वबळावर शिवसेना निवडणूक लढवेल नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती करण्याचा पर्याय खुला आहे. वरिष्ठांच्या कडून याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे वेळप्रसंगी स्वतंत्र अर्ज भरण्याचे इच्छुक उमेदवारांना सांगण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पाटील यांनी दिली आहे. सांगलीतील दांडेकर हॉलमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची बैठक झाली या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक शिवसैनिकांच्या निर्णयाबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे महायुतीमधून शिवसेना बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याचे मानले जात आहे.

