गोपनीय खबऱ्या | जत प्रतिनिधी
दिवाळीनंतर जत नगरपरिषद निवडणुकी संदर्भात जोरदार हालचाली होणार असून नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण गटासाठी खुले असल्यामुळे सर्व पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्यातच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी कोणाला द्यायची याची चाचणी सुरू असून यासाठी काँग्रेस व भाजपने उमेदवाराबाबत सर्व्हे सुरू केले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
काँग्रेस पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवाराचे दावेदार बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. युवराज निकम, तर युवा नेते अशोक बन्नेंनवर यांची नावे चर्चेत असून, या तिघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत काँग्रेस पक्षाने सर्व्हे सुरू केला असल्याची जोरदार सर्वत्र चर्चा आहे.
तर भाजपमधून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे ,युवा नेते विक्रम ताड तर प्रतिष्ठित व्यापारी सुभाष गोबी यांची नावे चर्चेत असून या तिघांपैकी कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत भाजपने सर्व्हे सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
तर भाजप ऐनवेळी मर्जीतल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देणार का.? हेही कदाचित पहायला मिळू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातून बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाकडून) राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संग्राम जगताप हे इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काँग्रेस यांच्यात युती झाल्यास नगराध्यक्ष पद कोणाकडे राहणार.? हे सर्व गणित युती झाल्यानंतर कळणार आहे. मात्र सर्वच पक्ष आपापल्या ताकदीवर कामाला लागले असून कोण उमेदवारी मिळण्यात यशस्वी होतात .? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. कोणता पक्ष कोणासोबत युती करणार हे दिवाळी नंतरच कळणार आहे.

