गोपनीय खबऱ्या | जत प्रतिनिधी
जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपला विजयी रथापासुन रोखण्यासाठी जिल्ह्यातील काही नेत्यांनी चंगं बांधला असून आता नाही थांबायचे म्हणत निर्धार केला आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय पाटील व जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात मनोमिलन झाले असून माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ येथे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला माजी आमदार विलासराव जगताप यांनी पाठिंबा दिला.
संजय पाटील व विलासराव जगताप ही गुरु शिष्यांची जोडी जिल्ह्याला परिचित असून संजय पाटील यांना खासदार करण्यात विलासराव जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. पण २०१९ साली विधानसभा निवडणुकीत विलासराव जगताप यांचा पराभव झाला. तो जगताप यांच्या जीव्हारी लागला. संजय पाटील यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष बळ दिले, असा आरोप जगताप यांनी केला होता .त्यानंतर या गुरु शिष्य जोडीमध्ये मिठाचा खडा पडला व आपल्या पराभवाचा वचपा जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत काढला. माजी खासदार संजय पाटील यांचा पराभव करण्यात सिंहाचा वाटा उचलला. मात्र राजकारणात कायमचा कोण कोणाचा शत्रू नसतो, कोण कोणाचा मित्र नसतो, याची प्रचिती आली असून जिल्ह्यात वाढत चाललेले भाजपचे प्रस्थ आता रोखण्यासाठी सर्वजण एकत्र येणे आत्ता गरजेचे आहे. असे मत महाविकास आघाडी आणि भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांचे आहे.
जत विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर हे विजयी झाले. बाहेरच्या तालुक्यातील उमेदवार या तालुक्यात आमदार होतो. हे तालुक्यातील नेते मंडळींच्याच मनाला शांत बसू देत नसल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजयाचा रथ व जिल्ह्यातील भाजपचा रथ रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नवी महा- विकास आघाडी होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यातच माजी मंत्री जयंत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांचा राजकीय संघर्ष वैयक्तिक पातळीवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम व माजी आमदार विक्रम सावंत हे सर्व एकत्र येऊन मोट बांधणार असल्याची चर्चा असून भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे.
आता मात्र संजय पाटील व विलासराव जगताप यांच्यातील मनोमिलन होऊन यंत्रणा लावण्याची पूर्व बैठक लवकरच होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी गोपनीय खबऱ्याला दिली.

