खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
जत तालुक्यात अलिकडच्या काळात जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते जोमाने जनसेवा करत असून, गावोगावी पक्षाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाला तालुक्यात मोठा वाव आणि जनाधार निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही जोरदार तयारी करत असून मोठ्या ताकदिने आगामी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जनसुराज्य युवाशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी सांगितले.
सोमवारी दि.१३ रोजी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षण सोडतीनंतर जनसुराज्य शक्ती पक्षाने जत तालुक्यातील डफळापूर, मुचंडी, बिळुर, उमदी आणि संख या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघामध्ये मोठ्या ताकदीने निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीसोबत आमची भूमिका कायम आहे. मात्र पक्षाच्या ताकदीप्रमाणे जागा वाटप झाले पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. जर आमच्या मागणीनुसार जागा मिळाल्या नाहीत, तर आमदार विनय कोरे व प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रणनीती निश्चित करण्यात येईल, असे बसवराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.