वडूज ; खबऱ्या प्रतिनिधी : मायणी येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी संस्थेची व त्यातील सदस्यांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्यासह सहाजणांवर विविध कलमांसह वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आ. गोरेंवर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
आ. जयकुमार भगवान गोरे, सौ. सोनिया जयकुमार गोरे, अरुण दादासो गोरे (तिघे रा. बोराटवाडी, ता. माण), शैलजा अशोक साळुंखे, स्मिता विरेंद्र कदम व महम्मद फारुक खान (रा. वडूज, ता. खटाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी स्मिता कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत आप्पासाहेब रामचंद्र देशमुख (वय 84, रा. मायणी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष आ. जयकुमार गोरे, सचिव सोनिया जयकुमार गोरे, अरुण गोरे यांनी शिक्षण संस्थेवर बेकायदेशीररीत्या ठराव करून घेऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आणले आहे. याबाबतचा वाद हा धर्मादाय आयुक्त कोल्हापूर येथे न्यायप्रविष्ट आहे.
छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोनिया जयकुमार गोरे, अरुण गोरे, सदस्या शैलेजा साळुंखे, सदस्या स्मिता कदम, सदस्य महमंद फारुक खान यांनी मायणी येथील संस्थेच्या मालकीची जमीन मिळकतीची नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालय कोल्हापूर यांच्या कार्यालयात पी. टी. आर. उतार्यास करुन संस्थेस पी. टी. आर. उतारा मिळण्याबाबतचे सर्व प्रकारचे कामकाज करण्यासाठी संचालक अरूण गोरे यांची निवड करुन तसा ठराव घेतला.
या मिळकतीच्या अनुषंगाने धर्मादाय आयुक्त यांचे समोर या संस्थेच्यावतीने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 22 प्रमाणे नोंद होवून मिळणेबद्दल संस्थेने तसा ठराव करुन मिळकतीच्या अनुषंगाने बदल करून काम पाहण्याकरीता अरुण गोरे यांना अधिकार दिले होते. शिवाजी एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे, अरुण गोरे यांनी आपआपसात संगनमत करुन छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांचे नावे मौजे मायणी येथे असणार्या स्थावर मिळकती सार्वजनिक न्यास कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे बदल अर्जाच्या अनुषंगाने अर्ज दाखल केलेला होता.
त्यांनी मायणी येथील मिळकतीपैकी काही मिळकती या संस्थेच्या सचिव सोनिया जयकुमार गोरे यांनी मिळकत सचिव म्हणून छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरच्या नावे बक्षीसपत्र करुन घेतली होती. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे, सचिव सोनिया गोरे, खजिनदार अरुण गोरे, सदस्या शैलेजा साळुखे, सदस्या स्मिता कदम, सदस्य महमंद फारुक खान यांनी आपापसात संगनमत करून सदर मिळकतीच्या बाबतीत या संस्थेच्या सभासदांना कोणतीही माहिती मिळू नये याची काळजी घेतली.
तसेच सदर मिळकतीच्या बाबतीत स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी विल्हेवाट लावण्याच्या गैरउद्देेशाने छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या असलेली स्थावर मालमत्तेसंबधी जाहीर नोटीस एका दैनिकात प्रसिध्द केली होती. जाहीर नोटीशीबाबत चौकशी केली असता ती नोटीसदेखील खोटी व बनावट प्रसिध्द केली असल्याचे समोर आले. याबाबत खातरजमा व पत्रव्यवहार संबंधित दैनिकाशी केल्यानंतर ही बाब समोर आली. यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार वडूज पोलिस ठाण्यात आप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांनी दिली आहे.
पहिल्या प्रकरणात आ. गोरेंना अटकेपासून अंतरिम संरक्षण नाहीच
मुंबई : मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजप आ. जयकुमार गोरे यांचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या आ. गोरे यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास न्यायमूर्ती अनिल मेनन आणि एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने नकार देत पुढील सुनावणी दि. 17 मे रोजी निश्चित केली.
आ. गोरे यांच्या वतीने अॅड. संजीव कदम आणि अॅड. पाटील यांनी या व्यवहाराशी गोरे यांच्या काहीही संबंध नाही केवळ राजकीय सुडापोटी आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, या जमिनीशी वैयक्तिक गोरे यांचा काहीही संबंध नाही. एका संस्थेचे पदाधिकारी असल्याने त्यात गुंतविण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे, असा युक्तिवाद केला. याला विशेष सरकारी वकील श्रीकांत गावंड यांनी जोरदार आक्षेप घेतला.
या सर्व प्रकाराचे प्रमुख सूत्रधार आमदार गोरे असल्याचा दावा गावंड यांनी केला. तसेच गोरे यांच्या विरोधातील सर्व पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत न्यायालयाने याचिकेची सुनावणी 17 मे पर्यंत तहकूब ठेवली. दरम्यान, अॅड. पाटील यांनी याचिकेत दुरूस्ती करण्याची परवानगी मागितली. तोपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती केली. मात्र न्यायालयाने याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी देताना अटकेपासून अंतरिम सरंक्षण देण्याची विनंती फेटाळून लालवी.
खटाव तालुक्यातील मायणी येथील मृत पिराजी भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे,दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (रा. विरळी ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल ता. माण) आणि अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार करून गुन्हा दाखल केला. पोलीसांनी संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला आ. गोरे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला गेला आहे.
दरम्यान, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे, महेश पोपट बोराटे हे दोघे संशयित बुधवारी न्यायालयाला शरण आले. लवकरच तपासी अधिकारी या दोघांचा ताबा घेणार असून न्यायालयाने तोपर्यंत संशयित दोघांची सातारा जेलमध्ये रवानगी केली आहे.

