कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सावळी (ता. मिरज) येथील गट नंबर 126/2 मधील जमिनीवर नवे जिल्हा कारागृह बांधणे तसेच गट नंबर 176 या गायरान जमिनीपैकी तीन हेक्टर 30 आर शासकीय जमीन व्ही.व्ही.पॅट मशीन गोदाम बांधकामास परवानगी देऊ नये, अशी मागणी सावळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावळी (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सावळी येथे नवीन जिल्हा कारागृह झाल्यास गावासह परिसरात गुन्हेगारांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे, अशी ग्रामस्थांना भीती वाटते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सावळी येथे नवीन जिल्हा कारागृहास परवानगी देऊ नये.
तसेच शासकीय जमिनीवर व्ही व्ही पॅट मशीन गोदाम बांधकामास ग्रामस्थांचा विरोध आहे. गावातील वाढत्या लोकसंख्येमुळे दफनभूमी व स्मशानभूमीसाठी सदरची जागा लागणार आहे. कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीला जागा देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सरपंच सन्मती गणे, कुबेर गणे, माजी उपसरपंच व सदस्य रोहित तांबडे, श्रीपती शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भरत शिंदे, माजी सरपंच लक्ष्मण मोरे, श्रीकांत डोंगरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

