खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
शहापूर येथील एका हायस्कूल परिसरात असलेल्या पान शॉपमध्ये (Paan Shop) बनावट नोटांच्या व्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पानपट्टी चालकाच्या सतर्कतेमुळे बनावट नोटा वापरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी (Ichalkaranji Police) प्रमोद पोवार, अवधूत पोवार (दोघे रा. सुतार मळा) या संशयितांना अटक केली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज पोवार यांच्या मालकीच्या पानपट्टीवर एक मे रोजी दुपारी प्रमोद पोवार आणि अवधूत पोवार हे आले होते. यावेळी पंकज पोवार यांचे वडील पानपट्टीत होते. त्यांना संशयितांनी २०० रुपयांची नोट नकली असल्याची माहिती असूनही खरे असल्याचा भास निर्माण करून २० रुपयांचे सिगारेट घेऊन १८० रुपये परत घेतले. यानंतर तीन मे रोजी याच दोघांनी पुन्हा २०० रुपयांची नकली नोट वापरून त्याच पद्धतीने व्यवहार केला.
यावेळी पानपट्टीवर उपस्थित असलेले पंकज पोवार यांना संशय आल्याने नोट तपासली असता ती नकली असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पंकज पोवार यांच्या फिर्यादीवरून शहापूर पोलिस ठाण्यात प्रमोद पोवार, अवधूत पोवार, अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंखे यांच्याविरोधात फसवणूक, बनावट चलन वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तपासात प्रमोद व अवधूत यांनी अर्जुन दळवी व ओंकार साळुंखे यांच्याकडून नकली नोटा २० टक्के कमिशनवर घेतल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी प्रमोद पोवार आणि अवधूत पोवार या दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना सात मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
बनावट नोटा आल्या कोठून?
पोलिसांकडून अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंखे यांचा शोध सुरू आहे. या टोळीने अजून किती बनावट नोटा तयार केल्या आणि त्या कोणकोणत्या दुकानांमध्ये खपवल्या, याची सखोल चौकशी केली जात आहे. बनावट चलन छपाईचे रॅकेट स्थानिक पातळीवर सक्रिय असल्याचा संशय असून, यामध्ये अधिक लोकांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

