खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी थांबविण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारल्याच्या गुन्ह्यात संबंधित महिलेसह तिघांना अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर या तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश सातारा न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान, पोलिस कोठडीत आपल्याला माराहाण झाल्याची तक्रार पत्रकार तुषार खरात यांनी केली, त्यानुसार न्यायालयाने खरात यांच्या वैद्यकीय चाचणीचे निर्देश दिले, वैद्यकीय चाचणीनंतरच सुनावणी झाली.
दरम्यान, तिघांनाही पुन्हा एकदा कोल्हापूर येथील कळंबा कारागृहाकडे नेण्यात आले आहे. खरातांच्या वकिलांनी वडूज पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore ) यांच्यावर एका महिलेने आक्षेपार्ह फोटो टाकल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संबंधित महिलेने बदनामी थांबवण्यासाठी गोरेंकडे तीन कोटींची खंडणी मागितली, त्यातील एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारली, अशी तक्रार वाईतील काँग्रेस नेते विराज शिंदे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली होती.
शिंदेंच्या तक्रारीनुसार संबंधित महिलासोबत, पत्रकार तुषार खरात, शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सुभेदार यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर गुन्ह्याचा तपास वडूज पोलिसांकडे देण्यात आला होता. त्यावेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर तिघांना सुरुवातीला दोन, त्यानंतर तीन अशी पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिघांनाही सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर तुषार खरात यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केली, अशी तक्रार केली. त्या तक्रारीनुसार न्यायालयाने खरात यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार खरात यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतरच या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तिघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
न्यायालयीन कोठडीच्या आदेशानंतर या तिघांनाही कोल्हापूर येथील कळंबा कारागृहाकडे नेण्यात आले आहे. खरात यांचे वकिल ॲड. राजेंद्र गलांडे यांनी वडूज पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी आज न्यायालयात केली आहे.

