मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने शासकीय कर्मचार्यास तब्बल 30 लाखांचा गंडा घालण्यात आला.
याप्रकरणी जावेद हारूण शेख यांनी नितीन कल्लाप्पा येडुरे आणि अक्षता नितीन येडुरे (दोघे रा. बुधवार पेठ, मिरज) या दाम्पत्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी, जावेद शेख हे पाटबंधारेमध्ये नोकरीस आहेत. जावेद शेख यांना नितीन आणि अक्षता या दाम्पत्याने त्यांच्या सानवी इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटी एल.एल.पी. या फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. तसेच त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून रक्कम गुंतवल्यास चार टक्के दराने अधिक पैसे देण्याचे आमिष दाखविले.
त्यानुसार जावेद शेख यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून तब्बल 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली. परंतु गुंतवणूक करूनदेखील येडुरे दाम्पत्याने त्यांना अधिकचा परतावा तर दिला नाहीच, तसेच गुंतवणूक केलेली 30 लाखांची रक्कमदेखील परत दिली नाही. जावेद शेख यांनी वारंवार पैशाची मागणी करून देखील त्यांना त्यांची रक्कम परत देण्यास येडुरे दाम्पत्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जावेद शेख यांनी दोघांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

