खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
तासगाव तालुक्यातील तुरची फाटा येथे एका पान टपरीसमोर सुंगधी तंबाखूसह मोटार, असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल तासगाव पोलिसांनी पकडला. याप्रकरणी पोलिस शिपाई नीलेश डोंगरे यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली.पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अमित कृष्णा पिसाळ ( वय 25 रा. येळावी, ता. तासगाव) व मारुती जगन्नाथ पिसाळ (वय 50, रा. वसंतदादा साखर कारखान्याजवळ, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. दोघांही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मोटारीसह सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, तुरची फाटा येथे शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधी तंबाखू विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती तासगाव पोलिसांना मिळाली.
या माहितीनुसार पोलिसांनी तुरची फाटा येथे सापळा लावला होता. संशयित मोटार (एमएच 10, डीटी 4149) एका पान टपरीसमोर थांबलेली दिसली असता पोलिसांनी छापा टाकला. संशयित मोटारीची तपासणी केली असता शासनाने प्रतिबंधित केलेली वेगवेगळ्या प्रकारची 26 हजार 800 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू मिळून आली. या ठिकाणी विक्री करण्याच्या उद्देशाने सुगंधित तंबाखूचा साठा केल्याचे दिसून आले. संशयित दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

