खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरात जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. आष्टा शहराजवळील शेतातील झाडावर लिंबू, काळी बाहुली, दोरा आणि टाचण्या टोचल्या असल्याचं आढळून आलंय.
त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. हा प्रकार नक्की कुणी केला, याचाही शोध सुरू आहे.
आष्टा शहरात अलीकडच्या काळात जादूटोणा, बुवाबाजी आणि अंधश्रद्धेचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवर उतारे आढळणे आता नित्याचे झाले असून, यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार वाढत आहे. आज तर, एका शेतातील झाडावर जादूटोणा केल्याचा प्रकार दिसून आला आहे. सांगलीच्या आष्टा येथील शिंदे मळ्याजवळ सागर शिंदे यांचं शेत आहे. त्यांच्या शेतात एक मोठं झाड आहे.
शेतातील झाडाच्या बुंध्याला काळी बाहुली, लिंबू आणि टाचण्या टोचल्या असल्याचं आढळून आलं आहे. हा प्रकार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, हा प्रकार जादूटोण्याचा असावा, अशी शंका लोकांकडून व्यक्त केली जात आहे. विज्ञानाच्या युगात अशा प्रकारच्या अंधश्रद्धा सुरू असल्याने अनेकांनी डोक्यालाही हात लावला आहे.
शहरात अशी चर्चा सुरू आहे की, काही बुवा- बाबा, अंगारे-धुपारे करणाऱ्या महाराजांनी अनेक लोकांना वेड लावले आहे. इतकेच नव्हे तर, काही राजकीय नेतेही अशा प्रकारांमध्ये अडकले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या प्रकारानंतर शिंदे मळा परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

