मुंबई – गोपनीय खबऱ्या | आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. जागा वाटपाच्या रणनीतीवर चर्चा झाली. मुंबईत महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांचा गट सर्वाधिक जागा लढणार आहे. याबाबत आघाडीतील इतर पक्ष सकारात्मक आहेत. उबाठा गटाने २० ते २२ जागांवर दावा ठोकला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीत मुंबईत ठाकरे गट जागा वाटपात मोठा भाऊ असणार आहे. ठाकरे गटाला अधिक जागा काँग्रेस आणि शरद पवार यांचा पक्ष सकारात्मक आहे. ठाकरे गटाने ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी २० ते २२ जागांसाठी आग्रह धरला आहे. काँग्रेस पक्ष १३ ते १५ जागांसाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे.
शरद पवार गट पाच ते सात जागांवर दावा सांगत आहे. काही जागांच्या संदर्भात निर्णय झालेला नाही. मुंबईतील काही महाविकास आघाडीतील दोन्ही तसेच काही जागांवर तिन्ही पक्ष दावा करीत असल्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागा वाटपात २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा सोडून, उर्वरित जागांवर इच्छुक उमेदवार आणि त्या पक्षाची ताकद यावर चर्चा झाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या मतदार संघामध्येसुद्धा एक दोन जागांमध्ये अदलाबदल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

