सांगली प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या | निलजी गावात राहणाऱ्या कर्नाटकातील मजुरी करणाऱ्या महिलेवर बलात्कार करून दागिन्यांची लूट करणाऱ्या संशयित सराईताला ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याच्या अन्य तीन साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. गजपती शिसफूल भोसले (वय ३०, आंबेडकरनगर, बोलवाड, ता. मिरज, जि. सांगली ) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
मागील महिन्यात २६ जुलै रोजी अंधाऱ्या रात्रीत चार संशयित इसम पीडित महिलेच्या घरात घुसले होते. त्यावेळी त्यांनी पिडीत महिला व परिवारातील सदस्यांना मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड जबरदस्तीने काढून घेतली होती. त्यानंतर एका चोरट्याने महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयित हा मिरज पूर्व भागातील एका शासकीय कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा त्याला ताब्यात घेऊन मुसक्या आवळल्या. त्याला खाकीचा पट्टा दाखवल्यानंतर त्याने तीन साथीदारांसह निलजी येथील चोरी आणि बलात्काराच्या घटनेची कबुली दिली. त्याला अटक करून मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सिकंदर वर्धन, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, रूपाली ठोंबरे, अनिल ऐनापुरे, अजय बेंदरे, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, रोहन गस्ते आदींच्या पथकाने केली.

