सांगली – गोपनीय खबऱ्या | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून २५ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेला सांगली बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. बांगलादेशमधील सत्तासंघर्षानंतर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाल्याचे समोर आले होते.
याचा निषेध म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सांगली बंदची हाक दिली होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला असून आता शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांगलादेश येथील हिंदू अत्याचार थांबवा या मागणीसाठी 25 ऑगस्ट रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानकडून सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या सांगली बंदचा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. या संदर्भातील निवेदन देण्यासाठी आज संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रतिष्ठांनकडून सांगलीत मोटरसायकल रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
शिवतीर्थपासून या मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली. यावेळी खुद्द संभाजी भिडे गुरुजी यांनीही या मोटरसायकल रॅलीत सहभाग घेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यानंतर संभाजी भिडे गुरुजी व अन्य पाच कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा बंद माघे घेण्यात आला असल्याचे जाहीर केले. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगैरे असल्याने शिवप्रतिष्ठांनी हा निर्णय घेतला आहे.
आपल्या हिंदू बांधवांवर बांगलादेश येथे होत असणाऱ्या अत्याचाराविरोधात केंद्र सरकारने कडक पाऊल उचलावे. प्रशासन काय कारवाई करते ते पाहून पुढचा निर्णय घेणार असल्याचे संभाजी भिडे यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी बांग्लादेशमधील अत्याचाराचा निषेध करत संताप व्यक्त केला होता. बांगलादेशमधील हिंदूंचे स्थलांतर होता कामा नये, त्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली होती. याचविरोधात शिवप्रतिष्ठानकडून सांगली बंदची हाक देण्यात आली होती.

