मिरज – खबऱ्या प्रतिनिधी | मिरज एमआयडीसी परिसरात स्ट्रीट लाईट बंद असल्याने चोरट्यांचे धाडस वाढले आहे. महापालिका प्रशासनाने समुद्रा नावाच्या कंपनीला स्ट्रीट लाईटचे काम दिले आहे. येथील नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असणाऱ्या आयएएस शुभम गुप्ता यांना तक्रारदार महिलेने चोरीचा प्रकार लक्षात येताच फोन केला. परंतु महापालिकेच्या प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही.

अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ करून घेतला. कुपवाड पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या या भागात नागरिक भीतीच्या छायेत आहेत. परिसरात गर्दूले नशेखोर यांचा वावर वाढला आहे. तर याच भागात अवैध धंद्याना ऊत आला असून देह व्यापार सुद्धा जोरात सुरु आहे. परिसरातील नागरिकांनी तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने पोलीस प्रमुख व आयुक्त यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
चोरट्यांनी एका छोट्या हॉटेल व नाष्टा सेंटर मध्ये दुकानाचे शटर उचकाटून जवळपास आठ हजारांचा माल लंपास केला आहे. याची तातडीने दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

