- डॅशिंग महिला पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
नंदुरबार/नाशिक : खबऱ्या ऑनलाइन – ACB Trap News | सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारु वाहतुकीचा व्यवसाय करु देण्यासाठी 21 हजार रुपयांची लाच मागितली. यातील 10 हजार रुपये लाच स्वीकारताना सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकासह चालक पोलीस शिपायाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. एसबीच्या या कारवाईमुळे नंदुरबार पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.23) करण्यात आली.
सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील (वय-44) आणि चालक पोलीस शिपाई गणेश भामट्या गावीत (वय-38) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने नाशिक एसीबीकडे तक्रार केली आहे.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे यात्रा उत्सव सुरू झाला आहे. या यात्रेत तक्रारदार दारु व्यावसायिकास दारू वाहतूक करण्यास परवानगी पाहिजे होती. त्यासाठी त्याने पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क केला. त्याबदल्यात त्याच्याकडे 21 हजाराची लाचेची मागणी पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस शिपाई गणेश गावित यांनी केली. तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याप्रकरणी नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.
प्राप्त तक्रारीची एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सारंगखेडा येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे दहा हजाराची रक्कम स्वीकारताना पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचा वाहन चालक शिपाई गणेश गावित या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस अंमलदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी यांच्या पथकाने केली.

