- तर पकडलेला डंपर सोडला?
- महसूल प्रशासनाच्या भूमिकेची तालुक्यात चर्चा
कडेगांव:- कडेगांव तहसील प्रशासन अवैध वाळू उपसा विरोधात आक्रमक झाले आहे वडिये रायबाग भगत मळा रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर तलाठ्याने पकडुन तहसील कार्यालयात जमा केला वैशिष्ठ म्हणजे भरारी पथक असताना पथका बाहेरील लोकांनी सदर वाहन पकडले. तर दुसरीकडे अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला होता मात्र काही चर्चे व तडजोडी अंती सोडला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महसूल प्रशासनाच्या या भूमिकेची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
वडिये रायबाग येथून भरून निघालेला अवैध वाळूचा ट्रॅक्टर भगत मळा रस्त्यावर दिसल्यानंतर तलाठ्याने पकडला मात्र तहसील कार्यालयात घेऊन येण्यास वाहन मालक अरेरावी करू लागल्यानंतर संबंधित तलाठ्याने याबाबतची माहिती तहसीलदार अजित शेलार यांना दिली. तहसीलदार शेलार यांनी तत्काळ दोन कोतवाल त्या ठिकाणी पाठवले व सोबत कडेगांव पोलिसांना ही कळवले. त्यानंतर सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणून लावला. भरारी पथक असताना भरारी पथकाला हा ट्रॅक्टर नदीत का सापडला नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वडिये रायबाग येथील अवैध वाळू उपसा का बंद होत नाही? येथील अवैध वाळू उपशास कोणाचा वरदहस्त आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तर दुसरीकडे हिंगणगाव येथे अवैध वाळूने भरलेला डंपर पकडला होता मात्र चर्चे व तडजोडी अंती तो सोडण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. खबऱ्याने याबाबत ब्रेकिंग टाकल्यानंतर बरेच वावटळ उठले. वाहन पकडल्याच्या वृत्ताचे कडेगांव तहसील प्रशासनाने खंडन केले आहे. उलट कडेगांव पोलिसांनी सदर वाहन पकडले होते पुढं काय झालं माहित नाही ? अशी प्रतिक्रिया एका कर्मचाऱ्याने वरिष्ठांना दिली असल्याचे समजते. मात्र हिंगणगाव येथे अवैध वाळूने भरलेला डंपर पकडला होता हे निश्चित झालं आहे. तो डंपर कोणाचा होता ? कोणी पकडला होता? का सोडला ? तर भरारी पथक असताना सदर डंपर कोठून भरून आला आणि पथकास का सापडला नाही ?असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शुक्रवारी रात्री,शनिवारी पहाटे व शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनांमुळे कडेगांव महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर सर्वसामान्य जनतेकडून शंका ही उपस्थित केली जात आहे त्यामुळं तहसीलदार अजित शेलार यांनी तत्काळ कठोर पावले उचलावी अशी मागणी होत आहे .

