शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूतेनी विरोधी पक्षनेत्यांना सादर केले पुरावे
सांगली:- कडेगांव पलूस मतदार संघात विधानसभा निवडणुक २०१९ च्या वेळी काम केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आलेल्या अतिकालिक भत्त्यात अफरातफर करून भ्रष्टाचार केला असल्या बाबतची कागदपत्रं घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी थेट विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व अंबादास दानवे यांची भेट घेतली व माहिती सादर केली. याबाबत दोन्ही नेत्यांनी सभागृहात हा विषय उपस्थित करावा अशी विनंती केली .

याबाबत विभुते यांनी दिलेली माहिती अशी की,विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. या निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्यादा केलेल्या कामाचे मोल (मोबदला ) देय करण्यासाठी २०२१ मध्ये निधी वितरित केला होता. या निधीमध्ये कडेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अफरातफर करून कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारण्यात आला होता शासकीय कर्मचारी नसणाऱ्या लोकांना अतिकालित भत्ता देय नसताना तो सढळ हाताने देण्यात आला आहे ,तर काही निवडक शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा सदर भत्ता देताना अधिकारी उदार झाल्याचे दिसत आहे .मात्र दुसरीकडे इतर कर्मचाऱ्यांवर अशी मेहेर नजर दिसून आली नसल्याचे पाहावयास मिळत नाही. मुळात दैनंदिन वेतनावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना अतिकालिक भत्ता द्यायचा नाही असं स्पष्ट शासकीय परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या अतिकालिक भत्त्याची कमाल मर्यादा माहे ऑक्टोबर २०१९ च्या देय होणाऱ्या मूळ वेतना एवढीच राहिलं असं ही परिपत्रकात नमूद करण्यात आलं असताना पूर्ण शासकीय परिपत्रक फाट्यावर मारण्यात आलं आहे.
सदर झालेली अफरातफर भविष्यात कधी उघड होऊ नये म्हणुन संबंधितानी बनावट कागदपत्रे तयार करून ती शासकीय दप्तरात दाखल करून ठेवली होती.संपूर्ण निवडणूक काळात काम केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारून बेकायदेशीर पणे हा भत्ता वितरित केला आहे. भत्ता वितरित करणाऱ्याने काही ठराविक लोकांवर एवढी मेहेरबानी का केली आहे? दैनंदिन वेतनावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना अतिकालिक भत्ता का देण्यात आला? ज्यादा रक्कम एठणाऱ्यांवर व ती रक्कम देऊ रिप्लाय करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार होणार का? ज्यादा रकमेची वसुली होणार का? मूळ कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे मोल मिळणार का? असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित केले जात असताना याबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली आहे व सभागृहात आवाज उठवावा व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. याबाबत दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास सांगलीयेथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे विभुते यांनी सांगितले.

