महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाचा इशारा
कडेगांव:- राज्याचे प्रधान सचिव व आयुक्त यांनी मान्यता देऊनही सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध का केली जात नाही? वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश झुगारून कनिष्ठ अधिकारी सेवाजेष्ठता यादीला केराची टोपली दाखवत आहेत का? असा प्रश्न विचारत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करून २३ वर्षांपासून रखडलेली पदोन्नती देऊन वैद्यकीय आधिकारी गट ब संवर्गाला न्याय द्यावा अन्यथा न्याय हक्कासाठी राज्यभर आंदोलन करावे लागेल असा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
राज्याच्या ग्रामीण, आदिवासी, नक्षलग्रस्त भागात अनेक वर्षापासून बी ए एम एस वैद्यकीय अधिकारी सामान्य जनतेची आरोग्य सेवा प्रामाणिक पणे करत आहेत. पण वेळोवेळी निवेदन करून ही वैद्यकीय अधिकारी (बी ए एम एस) गट ब संवर्गाची पदोन्नती २३ वर्षापासून प्रलंबित आहे. विभागात वैद्यकीय अधिकारी गट अ संवर्गात जी पदे रिक्त आहेत त्यात गट ब वैद्यकीय अधिकारी यांच्या पदोन्नती करिता आरक्षित पदांचा देखील समावेश आहे. गट ब संवर्गाला गट अ ही एकमेव पदोन्नती साखळी आहे .आजपर्यंत शासनाने तारांकित, लक्षवेधी तसेच शासन परिपत्रकाद्वारे प्रलंबित पदोन्नती बाबत सेवाजेष्ठता यादी अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे असे सांगितले आहे सदर यादी अंतिम प्रसिद्ध केल्यास पदोन्नतीचा २३ वर्षापासूनचा अनुशेष भरण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
प्रधान सचिव यांच्या आदेशानुसार आयुक्त यांनी कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांची अंतरिम सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत २०२२ मध्ये सादर केली आहे. शासनस्तरावर अंतरिम सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत प्रक्रिया १ वर्षापासून प्रलंबित होती. दि २९/११/२०२३ रोजी प्रधान सचिव यांनी मान्यता दिली आहे.
प्रधान सचिव साहेब व मा आयुक्त साहेब यांनी मान्यता देऊनही सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध का केली जात नाही?. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश झुगारून कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून सेवाजेष्ठता यादीला केराची टोपली दाखवली जात आहे का? असा प्रश्न महासंघाने विचारला आहे. यामुळे २३ वर्षापासून रखडलेली पदोन्नती आजरोजीही रखडलेली च आहे .
तरी वरिष्ठ आधिकारी यांनी तातडीने सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करून रखडलेली पदोन्नती देऊन वैद्यकीय अधिकारी गट ब संवर्गाला न्याय द्यावा अन्यथा न्याय हक्कासाठी राज्यभर आंदोलन करावे लागेल असा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय आधिकारी महासंघ चे राज्यअध्यक्ष डॉ अरुण कोळी, कोल्हापूर विभागाचे डॉ प्रवीण कोडग, डॉ बलभीम पवार, डॉ वैशाली पाटील, डॉ दीपा देशपांडे, डॉ मंगल पाटील, डॉ सुशांत रेवडेकर, डॉ भूषण यमाटे, डॉ शरद कुंवर, डॉ सोमनाथ अंकोलीकर, डॉ राहुल वाघ डॉ लांब व इतर वैद्यकीय आधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

