- शनिवारी रात्री वाळू तस्कराचा येरळेत धुडगूस
- वडिये रायबाग वांगी येथील अवैध वाळू उपसा रोखण्यात प्रशासनाला अपयश
कडेगांव:- कडेगांव तालुक्यात वडीये रायबाग येथे भरारी पथकाने अवैध वाळूने भरलेलं वाहन पकडले. मात्र कार्यालयात घेऊन येतो, असे सांगून पळवून नेले होते. परंतु भरारी पथक चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यानंतर व त्याची माहिती संबंधितास समजल्यानंतर सदर वाहन तहसील कार्यालयात स्वतः आणून हजर केल्याची घटना शनिवारी मद्यरात्री घडली आहे. शनिवारी रात्रभर धुडगूस चालला असल्याचे समजते. वडिये रायबाग,वांगी येथील सुरू असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यात कडेगांव महसूल प्रशासनास सपशेल अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
वडिये रायबाग येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शनिवारी रात्री बाराच्या आसपास अवैध वाळूने भरलेलं वाहन भरारी पथकास दिसले. संबंधित वाहन भरारी पथकाने ताब्यात घेतले. मात्र तहसील कार्यालयात घेऊन जाण्यास संबंधित वाहन चालक ना नू करू लागला, वादही घातला. त्यानंतर वाहन चालक वाहन वळवून कार्यालयात घेतो म्हणाला, आणि भरारी पथकास चकवा देऊन वाहन घेऊन त्याने पोबारा केला. पथकाने पाठलाग केला मात्र त्यांना अपयश आले. सदर घटनेची माहिती पथकाने वरिष्ठांना कळवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पथक चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र इकडे संबंधित वाहन तहसील कार्यालयात हजर केलं असल्याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर भरारी पथक परत फिरले. मात्र वाळूने भरलेले वाहन पळवून नेले होते. परंतु कार्यालयात हजर करताना तस्कराने वाहन खाली करून हजर केले असल्याचे समजते.
तालुक्यात वांगी वडिये रायबाग येथील अवैध वाळू उपसा रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी रात्री कारवाई केलेल्या तस्कराची यापूर्वी दोन वाहने तहसील कार्यालयात जमा आहेत. तर एक वाळूचा गुन्हा ही चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात संबंधितावर नोंद आहे.

