मिरज : खबऱ्या प्रतिनिधी/ आरग येथील पंढरपूर रेल्वे लाईनलगत असणाऱ्या मका फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगाराचा पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून मृत्यू झाला. संदीप नानासाहेब दिवटे (वय ३५ रा. शिंदेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.१६) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली.
आरग येथे मका फॅक्टरी आहे. मका धुतल्यानंतर ते सांडपाणी रिसायकल करून वापरण्यात येते. दहा हजार लिटर क्षमता असलेली सिमेंटची टाकी स्वच्छ करण्यासाठी एक कामगार टाकीमध्ये उतरला होता. त्याला मदत करण्यासाठी संदीप टाकीमध्ये उतरला, टाकीची खोली जास्त असल्याने दोघांचा श्वास गुदमरला. कर्मचाऱ्यांच्या ही घटना निदर्शनास येताच दोघांनाही तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु संदीप दिवटे याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.

