स्मार्ट पोलिसिंग करताना ॲक्टिव्ह झालेल्या खात्यातील अधिकाऱ्यांनी.. बॅटरी “लो” झालेल्या महसूल प्रशासनाच्या भूमिकेतील गुन्ह्यांची कामे केली, तर समाजाला आदर्श व अभिमानास्पद पोलीसच वाटतो. वाळू चोरांच्या मुसक्या आवळणे, अवैध वाळू तस्करी रोखणे हे महसूलचे काम असले तरी महसूल विभाग मात्र भांग पिऊन गाढ झोपेत आहे. उमदी पोलिसांच्या या कर्तबगारीचा जिल्हावासियांना सार्थ अभिमान आहे.
उमदी : खबऱ्या प्रतिनिधी /पांढरेवाडी (ता. जत) येथे नदीपात्रातून अवैद्यरित्या वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा ५ लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ३०) उमदी पोलिसांनी केली आहे.
याप्रकरणी मल्हारी करपे, प्रकाश करपे (दोघे रा. पांढरेवाडी) व सुरेश कोळी, रा. संख असे तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उमदी पोलीस ठाणे हद्दीतील संख दुरुक्षेत्र कार्यक्षेत्रात असलेल्या पांढरेवाडी येथील नदीपात्रातून अवैधरित्या चोरीने वाळू उपसा करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी या ठिकाणी छापा टाकून एक ट्रॅक्टर, एक ट्रॉली व वाळू असा एकूण ५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे , पोहेका कपील काळेल, आप्पासाहेब हाक्के, पो.का चौगूले, पोका सुदर्शन खोत यांनी केली आहे. अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

