कमी कालावधीत जादा परताव्याचे आमिष दाखवून ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ए. एस. ट्रेडिंग कंपनीचे लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस) यांना पोलिसांनी अटक केली.
राज्यभरात ए .एस .ट्रेडर्सच्या माध्यमातून ग्राहकांना जादा परतावाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक ग्राहकांना करायला लावली होती. ज्यादा रकमेच्या भुलभुलय्याला भुलून ग्राहकांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली होती. दरम्यान, ऑक्टोबर २०२२ पासून ग्राहकांना परतावा मिळणे थांबले. यामुळे ग्राहकांनी पोलिसांत तक्रार केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्यात ए. एस .ट्रेडर्स कंपनीसह २७ संचालक आणि एजंटावर गुन्हे दाखल केले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला. नोव्हेंबर २०२२ पासून ए. एस. ट्रेडर्सचे प्रमुख लोहितसिंग सुभेदार हा फरार होता. कोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
दरम्यान, सुभेदार हा गणपती दर्शन घेण्यासाठी मंगळवारी (दि.१९) कोल्हापूर जिल्ह्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आर्थिक गुन्हे अन्वेशषण शाखेने सापळा रचून सुभेदारला अटक केली.

