तहसीलदार साहेब, आता नोटीस नोटीस पुरे कडक कारवाई करा
कडेगाव:- अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी नेमलेल्या भरारी पथकातील एका कर्मचाऱ्याबरोबर त्याच्या एका रात्री पुरता व्यवहार ठरवूनही भरारी पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारी गाडी पकडल्याने वडीये रायबाग येथे येरळा नदी पात्रात रविवारी रात्री मोठा राडा झाला. या राड्यानंतर संबंधित वाहन पळवून नेण्यात तस्करास यश आलं असून सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या प्रकारानंतर मात्र कडेगाव तहसील प्रशासनाचे कारनामे ऐकावं ते नवलंच असं म्हणावे लागेल आणि आता तहसीलदार अजित शेलार यांनी नोटीस नोटीस खेळ न खेळता दोषींवर कडक कारवाईचा प्रस्ताव करावा अशी मागणी होत आहे.
कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करीने पुन्हा एकदा तोंड वर काढलं असून तहसीलदार अजित शेलार यांनी पुरती मोडकळीस आणलेली अवैध वाळूची यंत्रणा पुन्हा जोमाने कार्यरत झाली आहे. रविवारी रात्री वडीये रायबाग येथे अवैध वाळू तस्करी सुरु असल्याबाबत भरारी पथकास खबर मिळाली यानंतर सदर ठिकाणी गेल्यानंतर एक हिरव्या रंगाचा टेम्पो अवैध वाळू तस्करी करीत असल्याचे पथकास दिसून आले. सदर वाहन पकडल्यानंतर त्याठिकाणी वाहणाचा मालक आला आणि वाहन का पकडले? याबाबत विचारणा करू लागला. यावेळी पथक प्रमुख नायब तहसीलदार सागर कुलकर्णी यांचेसोबत संबंधिताने बाचाबाची केली. “नदीत जाण्यापूर्वी मी तुम्हाला विचारलं होतं,” असं बोलत पथकातील एका तलाठयाकडे वाळू तस्कराने बोट केल. तर “मी तुला जाऊ नको म्हणून सांगितलं होतं” असं प्रतिउत्तर तलाठयाने दिले.
मात्र यानंतर संबंधित वाळू तस्कराने आपले वाहन घेऊन तेथून पळ काढला. आता याप्रकरणी संबंधित वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ये रिश्ता क्या कहलाता है?
अवैध वाळू तस्कर एका तलाठ्याला रात्री त्याच्या भरारी पथकाच्या ड्युटी दिवशी मी नदीला जाऊ का? असं ज्या अर्थी विचारतो त्या अर्थी याचे नाते काय? असा सवाल उपस्थित केला जात असून वडीये रायबाग येथे सुरु असलेली अवैध वाळू तस्करी बाबत स्थानिक प्रशासन काय करते? हा सवाल हा सवालही उपस्थित केला जात आहे. नायब तहसीलदार सागर कुलकर्णी यांच्या समोर रविवारी रात्री अवैध वाळू तस्कर आणि तलाठी यांच्यातील हा संवाद घडल्याने कडेगाव तहसील प्रशासन आणि अवैध वाळू तस्कर यांच्यातील छुपे संबंध आता उघड झाल्याने तहसीलदार अजित शेलार यांनी दोषींवर शासकीय परिपत्रकाप्रमाणे कडक कारवाई करावी अशी मागणी होतं आहे.

