खबऱ्या ऑनलाइन – गुन्ह्यातून मुलाचे नाव वगळण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन 10 हजार रुपये लाच स्वीकारताना भंडारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. राजेश केशवराव साठवणे (वय 45, रा. हनुमान वॉर्ड तकीया रोड, भंडारा) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या एपीआयचे नाव आहे. एसीबीने ही कारवाई गुरुवारी (दि.17) रात्री उशिरा केली.
तक्रारदार यांचा मुलगा व अन्य तीन इसमा विरुद्ध भंडारा शहर पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. यामुळे तक्रारदार यांच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गुन्ह्यातून तक्रारदार यांच्या मुलाचे नाव वगळून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्याच्या मोबदल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक साठवणे याने तक्रारदार यांच्याकडे 12 ऑगस्ट रोजी 15 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे याबाबत तक्रार केली. प्राप्त तक्रारीवरून गुरुवारी पडताळणी केली असता आरोपी साठवणे याने 10 हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवली. त्यावरून सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 10 हजार स्विकारताना आरोपी एपीआय राजेश साठवणे याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात भंडारा एसीबीचे पोलीस उपअधीक्षक डॉ अरुणकुमार लोहार, पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस उपनिरीक्षक संजय कुंजरकर, गोस्वामी, अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार, चेतन पोटे,मयूर शिंगणजुडे, विवेक रणदिवे, राजकुमार लेंडे, अंकुश गाढवे, विष्णू वरठी, राहुल, अभिलाषा गजभिये यांनी केली.

