मिरज शहरातील शंभर फुटी तिरंगा लोकार्पण आणि महात्मा गांधी चौक सुशोभीकरण स्वातंत्र्यदिनी करण्यात येणार असून या निमित्ताने शनिवारी मिरजेत ३७५ फुटी तिरंगा ध्वजासह रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांमधील शेकडो मुले सहभागी झाली होती.
महापालिकेचे माजी स्थायी सभापती निरंजन आवटी यांच्या प्रयत्नाने मिरजेत महात्मा गांधी चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले असून याठिकाणी मिरजेचे वैशिष्ठ असलेले सतार, तंबोरा आणि सूरपेटीचे शिल्प उभारण्यात आले आहे. तसेच शंभर फुटी तिरंगा ध्वजही उभारण्यात आला आहे. याचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनी होणार आहे. या निमित्ताने शनिवारी मिरज हायस्कूल येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मिरज शहरातील विविध शाळामधील शेकडो मुले-मुली सहभागी झाल्या होत्या. मिरज हायस्कूलहून किसान चौक, लक्ष्मी मार्केट, सराफ कट्टा मार्गे महात्मा गांधी चौक या मार्गावर ही रॅली काढण्यात आली.
या रॅलीची सांगता पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे, डॉ. विनोद परमशेट्टी, नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, शिवाजी दुर्वे, उप अधिक्षक प्रणिल गिल्डा, शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे आदी सहभागी झाले होते.

