पुणे-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसचा विस्तार करण्यात आला असून ही गाडी आता मिरजेतून धावणार आहे. मिरज-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस मिरजेतून प्रत्येक रविवारी धावणार आहे.
उत्तरेत जाण्यासाठी दक्षिणेतून येणार्या रेल्वे गाड्यांवर मिरज, सांगलीतील प्रवाशांना अवलंबून रहावे लागत होते. त्यामुळे पुण्यातून सुटणार्या गाड्यांचा मिरजेपर्यंत विस्तार करावा, अशी मागणी मिरज रेल्वे कृती समिती आणि खा. संजय पाटील यांनी रेल्वे बोर्डाकडे केली होती. त्यानुसार रेल्वेकडून याला मंजुरी देण्यात आली असून या गाडीचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.
मिरज-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस प्रत्येक रविवारी पहाटे 4.50 वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसर्या दिवशी सकाळी 6.45 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी हजरत निजामुद्दीन येथून प्रत्येक शुक्रवारी रात्री 9.40 वाजता सुटेल आणि मिरजेत शनिवारी मध्यरात्री 1 वाजता पोहोचेल. या गाडीसह पुण्यातून सुटणार्या अन्य गाड्यांचा विस्तार देखील मिरजेपर्यंत करावा, अशी मागणी मिरज रेल्वे कृती समितीकडून करण्यात आली आहे.

