वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या एका सहायक फौजदाराने मद्यधुंद अवस्थेत असताना वाहन चालकांना शिवीगाळ करुन दंडाच्या नावाखाली पैशाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सहायक फौजदाराला निलंबित केले आहे. प्रेमचंद भानुदास वेदपाठक असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.
प्रेमचंद वेदपाठक शिवाजीनगर वाहतूक शाखेत सहायक फौजदार आहेत. मॉडेल कॉलनी परिसरात वाहतूक नियमन करत होते. कर्तव्यावर असताना वेदपाठक यांनी मद्यापान केले होते. त्यांनी वाहन चालकांना अडवडून दंडाच्या नावाखाली पैशांची मागणी केली होती. नागरिकांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
यासंदर्भात एका महिलेने शिवाजीनगर वाहतूक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी प्रेमचंद वेदपाठक यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. वेदपाठक यांनी पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले आहे.

