कडेगाव :- आगामी लोकसभा २०२४ ची निवडणूक विचारात घेवून मतदार यादी स्वच्छ व अचूक होणेच्या दृष्टीकोनातून मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार कडेगांव तालुकेमध्ये मतदार यादी शुद्धीकरण व मतदार जागृती अभियान दि. २१ जुलै २०२३ पासून राबविणेत येणार आहे अशा माहितीचे प्रसिद्धीपत्रक कडेगाव चे तहसीलदार अजित शेलार यांचे सहीने काढण्यात आले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हंटल आहे,या अभियाना अंतर्गत कडेगाव तालुकेतील १८ वर्ष वय पूर्ण असणा-या परंतु ज्यांचे मतदार यादी मध्ये नांव नाही, अशा सर्व मतदारांची नोंदणी करणेत येणार आहे. मयत तसेच स्थलांतरीत मतदार यांच्या नांवाची वगळणी करणेत येणार आहे तसेच मतदारांच्या नांव, वय, पत्ता यांचे मध्ये दुरुस्ती असलेस, दुरुस्ती करणेत येणार आहे. तरी मतदार यादीमध्ये नवीन नांवाची नोंद करणे, मतदार यादीतील नांव वगळणे व नांव, वय, पत्ता, फोटो यामध्ये दुरुस्ती करणे इत्यादी करीता अनुक्रमे नमुना नंबर ६,७ व ८ चे फॉर्म भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे देणेत यावे.
मतदार जागृती अभियान व मतदार शुद्धीकरण मोहिमेचा सर्व मतदारांनी उस्फूर्तपणे लाभ घेवून मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ विजयकुमार देशमुख व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार अजित शेलार यांनी केले आहे.

