हल्ल्यात तलवार,कुऱ्हाड, चाकू ,लोखंडी गज व दांडक्याचा वापर
कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करीने अखेर एकाचा जीव घेतला असून अवैध वाळू तस्करीच्या वादातून कान्हरवाडीत दोन सख्ख्या भावांवर खुनी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एक जण मयत झाला आहे. सचिन मदने असे मयत व्यक्तीचे नाव असून त्याचाच भाऊ खंडू मदने हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून मयत व जखमीचे भाऊ अशोक मदने यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.एकूण सात जणांच्या वरती कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शनिवार दि. ३ जून २०२३ रोजी रात्री १० चे सुमारास कान्हरवाडी गावचे हद्दीत येतगाव रोडवर सचिन हणमंत मदने वय ३२ तर खंडू हणमंत मदने वय ३५ हे दोघे येरळा नदीच्या पात्रातून पिकअप क्र MH12 DT 27 ही गाडी अवैध वाळूने भरून घेऊन येत असताना आरोपींनी गाडी अडवून गाडीत बसलेल्या सचिन व खंडू यांच्यावर हल्ला केला. यात गाडीची समोरील काच फोडून आरोपींनी हातातील तलवार, चाकू, कुऱ्हाड ,लोखंडी गज आणि लाकडी दांडक्यांने सचिन व खंडू यांना मारहाण केली. सचिन याच्या पाठीवर तलवार व चाकूचे वार करण्यात आले तर खंडू याचे खांद्यावर व पायावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले तसेच गज व दांडक्याने मारहाण करण्यात आली. यात सचिन उपचारापूर्वी मयत झाला असून खंडू गंभीर जखमी झाला आहे. अवैध वाळू तस्करीत वाळू भरण्याच्या हद्दीवरून हल्लेखोर व मदने यांच्यात वाद होता असं बोललं जात आहे. अवैध वाळू तस्करी एक दिवस कोणाचा तरी जीव घेईल त्यावेळी प्रशासन जागे होईल असं यापूर्वीच गोपनीय खबऱ्याने वारंवार वृत्तांकन केलं होतं. ते आज खरं ठरलं आहे.
कडेगाव तालुक्याच्या पूर्व भागात कान्हरवाडी,तुपेवाडी, भिकवडी ,नेवरी आणि आंबेगाव या भागातून अवैध वाळू तस्करी सुरू असते. कान्हरवाडीत शनिवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली त्यावेळी मयत व जखमी मदने हे वाळूची खेप भरून घेऊन आले होते.याबाबत मयत सचिन मदने याचा मोठा भाऊ अशोक हणमंत मदने याने फिर्याद दिली असून फिर्यादीवरून एकूण सात जणांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी करत आहेत.

