‘तुझं नाव काय, तू कोण आहेस बघतोच आणि मी कोण आहे हे पण तुला दाखवतो’, असे गुरगरत शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने चक्क तासगाव पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला दमबाजी केली. पोलीस ठाण्यात हा प्रकार घडूनही संबंधित तथाकथित पदाधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस पोलीस निरीक्षक अथवा संबंधित कर्मचाऱ्यांने दाखवले नाही. कोणीही यावे आणि पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांवर गुरगुरावे, असे होत असतानाही पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे हे मात्र शांतच आहेत.
याबाबत माहिती अशी : एका प्रकरणात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला त्याच्या साथीदारांसह पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. चौकशीसाठी त्याला एका खोलीत ठेवण्यात आले होते. सेनेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी उचलून नेल्याने या पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती.
दरम्यान, ज्या पदाधिकाऱ्याला उचलून पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी एका घटनेत नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला होता. या मारहाणीत संबंधिताची कपडे खराब झाली होती. त्यामुळे त्याला भेटायला आलेल्या इतर एका पदाधिकाऱ्याने स्वतःच्या अंगावरील शर्ट काढून खोलीत असणाऱ्या ‘त्या’ पदाधिकाऱ्याला देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून तेथील पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित सेनेच्या पदाधिकाऱ्याला चांगलेच झापले.
तर सर्वांसमोर आपला अपमान झाला या भावनेने हा पदाधिकारी चांगलाच संतप्त झाला. त्याच्यातील राजकीय कार्यकर्ता जागा झाला. त्यानंतर तो तथाकथित पदाधिकारी पोलिसावर गुरगुरु लागला. ‘तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे, असे अरेतुरे बोलत पोलिसाशी वाद घालू लागला. ‘तुला मी कोण आहे दाखवतोच’, अशी दमबाजीही करू लागला.
हा सगळा प्रकार पोलीस ठाण्यात झाला असताना पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा कोणताही गुन्हा दाखल केला नाही. जर याच ठिकाणी एखादा सर्वसामान्य माणूस असता तर त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल करण्याची भूमिका कर्तबगार पोलिसांनी घेतली असती. त्यामुळे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर ‘नांगी’ टाकणाऱ्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे हेही शांतच आहेत. आपल्या कर्मचाऱ्याला कोणीतरी येऊन चक्क पोलीस ठाण्यात अरेतुरे करत दमबाजी करत असताना त्याच्यावर ॲक्शन घेण्याचे धाडस निंभोरे यांनी दाखवले नाही. कदाचित अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांच्या बुडाखाली कमालीचा अंधार असल्याने संबंधित पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवले नसावे, अशी चर्चा आहे.

