राजकारणात खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदाराच्या वडिलांनी आपल्याला धक्काबुक्की आणि घरातून बाहेर काढल्याचा आरोप करत आपल्या पोटच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
बीड : बीडच्या राजकारणातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी या प्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलिसांनी संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी आपल्या दुसऱ्या मुलाविरोधातही फिर्याद दिली आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्यासह त्यांचे भाऊ अर्जुन क्षीरसागर यांच्यावर देखील गुन्हाची नोंद आहे. क्षीरसागर बंधूंवर कलम 323, 504, 506, 34 अंतर्गत सदरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

