सांगली: खबऱ्या प्रतिनिधी/ बऱ्याचदा अर्धवट ज्ञान असल्याने किंवा घाबरून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले जात नाहीत. अशावेळी माहिती असलेल्या व्यक्तीचा आधार घेऊन किंवा कोणाच्या तरी सांगण्याला भुलून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले जातात.
तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर वेळीच सुधारा, याचं कारण म्हणजे एका भामट्याने शेअर मार्केटद्वारे चक्क कोट्यवधी रुपयांचा गंडा लोकांना घातला आहे. शेअर मार्केटच्या माध्यमातून कमी कालावधीत जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून आटपाडी परिसरातील गुंतवणूकदारांना एक कोटी २७ लाख रुपयांचा गंडा घालकणाऱ्या संतोष ढेमरेस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीनं इतर सहकाऱ्यांच्या मदतीने टीएचएस ट्रेडर्स एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती. गंडा घालून पसार झालेल्या ढेमरे याच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. या कंपनीच्या माध्यमातून आटपाडी परिसरातील गुंतवणूकदारांची फसवणूक होताच संतोष ढेमरेसह संदीप धोंडिराम ढेमरे, विनोद दादासाहेब कदम, हारुण इस्माईल तांबोळी (रा. सर्व आटपाडी) यांच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संतोष ढेमरे हा पसार होता. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास संशयित संतोष हा पुणे येथील बिबवेवाडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिथे जात अटक केली. संशयित संतोष ढेमरे यास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

