सांगली: खबऱ्या प्रतिनिधी/ अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते उद्या पार पडणार आहे. अनेक मंत्री या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
यासाठी भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे. आज स्मारकाची आणि मंडपाची पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी भाजपावर (BJP) टिकास्त्र सोडले.
अहिल्यादेवी होळकर स्मारकावरून सांगलीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. गोपीचंद पडळकर यांनी स्मारकाचे २७ तारखेला ड्रोन द्वारे उदघाटन केले होते. आणि उद्या महाविकास आघाडी तर्फे स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघातले माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह ४८ हजार समर्थक व कार्यकर्ते उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. यावर जयंत पाटील म्हणाले, आम्ही भाजप सारखे पुढचे काही बोलत नाही.ज्यावेळी प्रवेश असेल त्यावेळी ते कळेल असा टोलाही त्यांनी हाणला.
पुढे ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील जी आरोग्यकेंद्रे आहेत, ती आदर्श आरोग्य केंद्रे कशी करायची याबाबत बैठक घेऊन चर्चा करणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

