पुणे/मुंबई (प्रतिनिधी) – शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पुण्यातून एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयिताने दारूच्या नशेत धमकी दिली, अशी प्राथमिक माहिती असल्याचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी जाहीर केले. खासदार राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई या कुख्यात टोळीच्या नावाने धमकीचा संदेश आला होता. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन, मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. राहुल तळेकर (रा. वडगाव शेरी) असे संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. या धमकीनंतर संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. हे विरोधकांना तुरुंगात टाकायला तयार आहे, किंवा त्यांना मारण्यापर्यंत यांची मजल जाऊ शकते, असा गंभीर आरोप खा. राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांना मोबाईलवर धमकीचा मॅसेज आला होता. हिंदूविरोधी असल्यामुळे मारून टाकू, अशी धमकी संजय राऊत यांना देण्यात आली. ‘दिल्लीत आल्यावर एके-४७ रायफल्सने उडवून टाकू, मुसेवाला टाईपमध्ये मारु, अशी धमकी राऊतांना देण्यात आली आहे. तसेच लॉरेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स… तयारी करके रखना’ असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत यांना धमकी देणार्या व्यक्तीची ओळख पटली आहे. धमकी देणारी व्यक्ती दारूच्या नशेत होती, असा प्राथमिक रिपोर्ट आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाईल. धमकी कोणीही दिली असली तरी कारवाई होईल. राज्यात कोणी कुणाला धमकी दिली तरी पोलीस आणि सरकार शांत बसणार नाही. कोणत्याही व्यक्तीवर कारवाई होईल, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, धमकी प्रकरणी पुणे पाेलिसांनी पकडलेला आराेपी तळेकर हा एका हॉटेलमध्ये काम करत आहे. त्याने अशाप्रकारचे कृत्य कशासाठी केले आहे, तसेच त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी नेमका काय संबंध आहे, याबाबतचा तपास पोलीस करत आहे. पुणे पोलिसांनी पुढील तपासासाठी त्याचा ताबा मुंबई पोलिसांना दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
खा. राऊत यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी – खा. सुप्रिया सुळे
संजय राऊतांना धमकी आल्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. संजय राऊत हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल असे बोलणे हे दुर्देवी आहे. हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. झेपत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खा. सुळे यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही बोलणार आहोत. संजय राऊत यांना तातडीने झेड प्लस सिक्युरिटी दिली पाहिजे, अशी माझी सरकारकडे आग्रहाची विनम्र विनंती राहील. या पद्धतीने कोणाची हिंमतच कशी होते, असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला आहे.

