मिरज प्रतिनिधी /मिरज शहरातील कृष्णा घाट येथून वाहतूक सुरू असलेला कर्नाटकातील गुटखा जप्त करण्यात महात्मा गांधी पोलिसांना यश आले आहे. टेम्पो चालक इरशाद उर्फ मोहम्मद शौकत शेख (वय 43) राहणार सांगलीवेस मिरज असे ताब्यात घेण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्याकडून सुगंधी तंबाखू, पान मसाला आणि गुटखा साहित्य असा ४ लाख ५७, ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने मंगळवारी दुपारी ही कारवाई केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी अडीच वाजता मिरज कृष्णा घाट रस्त्यावरील बेळगाव रेल्वे गेट येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी एम एच १० बी आर ४३१५ या टेम्पोतून इरशाद शेख हा गुटख्याची वाहतूक करत असताना पोलिसांना मिळून आला. सदर गुटखा हा कर्नाटकातून सातारा येथे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सदर टेम्पो मधून ४ लाख ५७,४६५ रुपयांचा गुटखा जप्त केला असून, टेम्पो चालक इर्शाद याला अटक करण्यात आली आहे.

