कोल्हापूर, खबऱ्या प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (दि. 19) कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
अमित शहा यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार असून लोकसभेची रणनीती या बैठकीत ठरविण्यात येणार आहे. तसेच विजय संकल्प रॅलीच्या माध्यमातून ते कोल्हापुरातून भाजपच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत.
अमित शहा यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह रविवारी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी पुण्याहून हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते थेट अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी 1 वाजून 45 मिनिटांपासून ते 2 वाजून 15 मिनिटांपर्यंत अर्धा तास ते अंबाबाई मंदिरात असणार आहेत.
तेथून ते 2.30 वा. मध्यवर्ती शिवाजी चौक येथे येतील. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते दसरा चौकात येऊन राजर्षी शाहू छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करतील. दुपारी 2.40 ते 3.10 पर्यंत त्यांचा राखीव वेळ असेल.
दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पेटाळा मैदान येथे न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमित शहा यांच्या पत्नी सौ. सोनल शहा यांनी याच संस्थेच्या प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. सायंकाळी साडेचारपर्यंत हा कार्यक्रम आहे. सायंकाळी 5 वाजता त्यांच्या हस्ते भाजपच्या नागाळा पार्क येथील कार्यालयात बांधण्यात येणार्या गणपती मंदिराची पायभरणी करण्यात येणार आहे. त्याचवेळी विजय संकल्प रॅलीला ते मार्गदर्शन करणार आहेत. आर. व्ही. ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भाजपचे जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत. रात्री 8 वाजता भाजपच्या निवडक 150 प्रमुख पदाधिकार्यांची ते बैठक घेणार आहेत. ही बैठक एक तास चालणार आहे. या बैठकीतच आगामी कोल्हापूर व हातकणंगले लोेकसभा मतदारसंघासाठी भाजपची रणनीती ठरविण्यात येणार आहे. ही बैठक अटोपून शहा हे रात्री साडेनऊ वाजता विमानाने दिल्लीला प्रयाण करणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे अमित शहा यांच्या समवेत न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमापर्यंत एकत्र असणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे तेथून सुमंगलम् पंचमहाभूत महोत्सवांतर्गत काढण्यात येणार्या शोभायात्रेत सायंकाळी साडेचार वाजता ते गंगावेश येथे सहभागी होणार आहेत. तेथून ते यात्रेत सहभागी होत पंचगंगेवर होणार्या महाआरतीला उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता ही महाआरती होणार आहे.

