राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीला तासगाव पंचायत समितीतून विविध माध्यमांना अभिवादनाच्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. या जाहिरातीचे पैसे तत्कालीन गटविकास अधिकारी व सभापतींच्या स्वीय सहाय्यकाने जमा केले. मात्र अनेक पत्रकारांना हे पैसे मिळालेच नाहीत. या पैशांवर गटविकास अधिकारी व सभापतींच्या स्वीय सहाय्यकाने डल्ला मारला असल्याचा आरोप माजी सभापती संजय जमदाडे यांनी केला.
संजय जमदाडे हे तासगाव पंचायत समितीचे सभापती होते. त्यांच्या काळात त्यांनी 16 फेब्रुवारी 2022 रोजी आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीला विविध माध्यमांना अभिवादनाच्या जाहिराती दिल्या होत्या. या जाहिरातींच्या बिलाचे पैसे पंचायत समितीच्या विविध विभागांमधून ‘वसूल’ केले जातात. जमदाडे यांनी हे पैसे ‘वसूल’ करण्याची जबाबदारी तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांकडे दिली होती. तर सर्व पत्रकारांना जाहिरातीचे अंक व बिले सभापतींच्या स्वीय सहाय्यकाकडे देण्यास सांगितले होते.
दरम्यानच्या काळात पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला. सगळेजण आपापल्या कामात मग्न झाले. त्यातच गटविकास अधिकाऱ्यांचीही बदली झाली. त्यामुळे अनेक पत्रकारांना आजही जाहिरातीचे पेमेंट मिळाले नाही. अनेक पत्रकारांनी स्वतःच्या खिशातून आपल्याला ऑफिसला पैसे भरले आहेत.
याबाबत जाहिरात देणाऱ्या संजय जमदाडे यांना विचारले असता ते म्हणाले, तत्कालीन गटविकास अधिकारी व सभापतींच्या स्वीय सहाय्यकाने पत्रकारांना दिलेल्या जाहिरातीचे पैसे जमा केले आहेत. विविध खात्यांच्या प्रमुखाकडून हे पैसे ‘वसूल’ केले आहेत. मात्र ते पत्रकारांना देण्यात आले नाहीत. या पैशांवर तत्कालीन गटविकास अधिकारी व सभापतींच्या स्वीय सहाय्यकाने डल्ला मारला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

