कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची सागरी सुरक्षा विभाग येथे तातडीने बदली करण्यात आली आहे.
३० डिसेंबरला जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी कणकवली पोलिस ठाण्यात भेट दिली होती. त्यानंतर ३१ तारीखेला तातडीने त्यांच्या बदलीचे आदेश आले.
पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या जागी सागरी सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अचानक बदलीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सचिन हुंदळेकर यांनी कणकवली पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर तालुक्यातील कायदा, सुव्यवस्था सुरळीत रहावा, यासाठी नेहमीच प्रयत्न केले गेले होते. विशेषतः दिवसा अथवा रात्रीही घडलेल्या अपघात व तत्सम घटनांप्रसंगी ते घटनास्थळी पोहोचत असत. कणकवली तालुका हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका आहे. येथे गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे बदल्यात पोलिसांचे मनुष्यबळ कमी असून देखील त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात उत्कृष्ट काम केले होते. त्यामुळे अचानक त्यांच्या झालेल्या बदलीमुळे कणकवलीत चर्चा रंगल्या आहेत. वस्तुस्थिती पाहता जिल्ह्यात थांबलेला पोलीस अधिकाऱ्यांचा असो किंवा पोलीस निरीक्षकांचा संगीत खुर्चीचा खेळ अद्याप थांबलेला नाही.

