School bus accident : इचलकरंजी : खबऱ्या प्रतिनिधी/ शाळकरी मुलींच्या सहलीची बस पुलावरुन कोसळली असून यात २४ मुली किरकोळ, तर तीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बारामती-पाहुणेवाडी हद्दीतून जाणाऱ्या राज्यमार्गावर हा अपघात झाला.
इचलकरंजी-कोल्हापूर येथील एका खासगी क्लासच्या सहलीची ही बस आहे.जखमी मुलींवर बारामती हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत .मुलींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पहाटेच्यावेळी बसचालकाला झोप लागल्याने हा अपघाच झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रस्त्यावरील पुल व वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या बसमध्ये ४८ मुली, पाच शिक्षक, दोन चालक होते. यातील चालक श्रीपाद पाटील हे जखमी झाले आहेत.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करुन त्यांनी रुग्णालयात हलवले.
माळेगाव, वडगाव निंबाळकर आणि बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेबरोबरच पोलिस गाडीतून संबंधित अपघातग्रस्त मुलींना बारामती महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
इचलकरंजी-कोल्हापूर येथील खासगी सागर क्लासेसच्या मुलींची सहल शिर्डी येथे गेली होती. येथून परत येत असताना पहाटे साडेतीन ते चार वाजल्याच्या सुमारास ही ट्रॅव्हल्स बारामतीकडून फलटण मार्गे निघाली होती.चालकाचा पाहुणेवाडी येथील पुलावर गाडीचा ताबा सुटल्याने गाडी ओढ्यात कोसळली.

