प्रांताधिकाऱ्यांनी ही घेतली दखल
कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील रामापूर येथील टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉली अपघात प्रकरणी वांगी येथील विश्वनाथ अमर शिंदे याच्या विरोधात चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फिर्याद रामापूर येथील रेवनसिद्ध महादेव गायकवाड यांनी दिली आहे तर कडेगावच्या तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी वांगी मंडळ अधिकारी, वांगी तलाठी, रामापूर तलाठी व भरारी पथकास कारणे दाखवा नोटीस काढल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. इकडं प्रांताधिकारी गणेश मरकड यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून अवैध वाळू तस्करी विरोधात कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या असल्याचे वृत्त आहे.
रामापूर येथे बुधवार दि २८ डिसेंबर च्या रात्री ९ च्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने ऊस भरून थांबलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली होती. यात अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झालं होतं. या प्रकरणी गुरुवारी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात वांगी येथील शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इकडं महसूल प्रशासनाने ही कार्यवाहीला सुरुवात केली आहे. तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी वांगी मंडळ अधिकारी, तलाठी, रामापूर तलाठी व अवैध गौण खनिज प्रतिबंधक भरारी पथकातील सर्वांना कारणे दाखवा नोटीस काढल्याचे वृत्त आहे. प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी सुद्धा याप्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं समजते. अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणात कठोर पावले उचलण्याबाबत सूचना दिल्याचे वृत्त आहे.

