गंगापूर (विजय बन्सोड) : नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाची औरंगाबादमध्ये पण पुनरावृत्ती झाली आहे. बहिणीला बारा वर्षांपूर्वी पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने आपल्या भाऊजीचा औरंगाबाद-पुणे महामार्गावर दहेगाव बंगलाजवळ इसारवाडी फाटा येथे भर रस्त्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून केला. विशेष म्हणजे आरोपीने एवढ्यावरच न थांबता खून केल्यानंतर रस्त्यावरच जल्लोष करून नंतर दुचाकीवरून घटनास्थळावरून पोबारा केला, असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. बाबासाहेब उर्फ बापू छबुराव खिल्लारे (३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, खुन करुन फरार झालेल्या आरोपीच्या पोलीसांनी चार तासातच मुसक्या आवळल्या.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा थरार घडला. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आरोपी सचिन शामराव नाटकर रा भोकर व मयत हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यात गेल्या बारा वर्षांपासून वाद होता. बापू खिल्लारे याने बारा वर्षांपूर्वी आरोपीच्या बहिणीला पळवून नेवून तिच्याशी विवाह केला होता.या दोघांतील वादाचा शेवट झाला.
गुरुवारी बाबासाहेब उर्फ बापू हा ईसारवाडी फाट्यावर चहा पीत होता. त्याच दरम्यान आरोपी सचीन नाटकर दुचाकीवर आला. बापूला पाहताच आरोपी कुऱ्हाड घेऊन त्याच्या मागे धावला. बापूला पळून जाण्याची संधी न देता आरोपीने त्याच्यावर सपासप कुऱ्हाडीने वार केले. हे वार वर्मी बसल्याने बापू जागीच कोसळला आणि गतप्राण झाला. यानंतर सचीन या आरोपीने फरार होण्याआधी जल्लोष केला आणि त्यानंतर कुणाच्याही तावडीत पडण्याआधीच दुचाकीवर बसून निघून गेला.
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांसह सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, सहायक पोलीस निरीक्षक ए पी लोंढे, उपनिरीक्षक सखाराम दिलवाले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. बापू खिल्लारे याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली. भर रस्त्यात झालेल्या या थरारक घटनेदरम्यान वाळुज महामार्गावरील दुतर्फा वाहनांची कोंडी झाली होती.
आरोपीला श्रीरामपूर पोलीसांनी चार तासात पकडले…
श्रीरामपुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि ज्ञानेश्वर थोरात यांना वाळुजचे पोनि. सचिन इंगोले यांनी कळविले की, वाळुज पोलीस ठाण्यात भा.द.वि.क. 302 वगैरे गुन्हयातील आरोपी सचिन शामराव नाटकर, रा भोकर, ता श्रीरामपुर, जि अहमदनगर याने 12 वर्षापुर्वी त्याच्या बहिणला पळवुन नेण्याचे कारणावरुन बाबासाहेब छबुराव खिलारे, रा- भोकर, ता श्रीरामपुर, जि अहमदनगर याचा आज 29 डिसेंबर रोजी सांय 05.00 वा चे सुमारास खुन केला आहे. आरोपी सचिन शामराव नाटकर रा भोकर ता श्रीरामपुर जि अहमदनगर येथे राहणारा आहे.

