मुंबई (मनीष कांबळे :खबऱ्या प्रतिनिधी) – आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी हे मुख्यालयी न राहता, शहराच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी राहून अप-डाऊन करतात. त्यामुळे खेड्यापाड्यातील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळत नाही. याबाबत सांगली जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील असले प्रकार ‘गोपनीय खबऱ्या’नेही चव्हाट्यावर आणले होते. आरोग्य विभागात काम करणारे अनेक अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी न राहता इतरत्र राहत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक परिपत्रक काढून मुख्यालयी राहण्याचा आदेश दिला आहे. तसेच, हे अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे आढळून आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारादेखील मुंढे यांनी दिला आहे. तसेच, रात्रीच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात हजर नसल्यास अशा डॉक्टरांना थेट निलंबित केले जाणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य विभागात काम करणारे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मुख्यलयी न राहता, अन्य ठिकाणी राहून घरभाडे भत्ता उचलत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कर्मचार्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशदेखील आयुक्त मुंढे यांनी दिले आहेत. आरोग्य विभागाचा आयुक्तपदाचा चार्ज घेताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामाचा धडाका लावला आहे. मुंढे हे सुरुवातीला बेशिस्त व कामचोर अधिकारी, कर्मचार्यांना इशारे देतात, थेट कारवाई करत नाहीत. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर कठोर कारवाईचे शस्त्र उगारतात. आतादेखील त्यांना आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स यांना कामात सुधारणा करणेसंदर्भात इशारे दिले आहेत. त्यानुसार, त्यांनी एक पत्रक काढून मुख्यालयी राहणे सक्तीचे केले असून, रात्रीच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात हजर नसल्यास अशा डॉक्टरांना थेट निलंबित करण्याचा इशारादेखील दिला आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी आरोग्य विभागातील अधिकार्यांनी धाडसत्र कारवाई सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी, वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. परंतु, या कारवाईची माहिती लीक झाल्याने कामचोर कर्मचारी, अधिकारी वाचले होते.
तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यानंतर ते अॅक्शन मोडवर आले आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याची सेवा करण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय कर्मचार्यांना दिल्या होत्या. मात्र काहीच दिवसात धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंनी कारवाईचा तडाखा लावला. त्यांच्या याच धडाकेबाज कामाची सध्या चर्चा होत आहे.

