कडेगाव:- राज्य सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधा किट म्हणजेच दिवाळी सणासाठी साखर, रवा, पामतेल आणि हरभरा डाळ हे प्रत्येकी एक किलो यांचं अखेर कडेगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये वाटप सुरू झालं आहे. दिवाळी सुरू होण्यास अवघा एक दिवस राहिला असताना हा सरकारचा घोषित शिधा लोकांना मिळणार का ? याबाबत सवाल उपस्थित केला जात होता.
राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळी सणासाठी साखर, रवा, पामतेल आणि हरभरा डाळ हे प्रत्येकी एक किलो, अशा चार वस्तू अवघ्या १०० रुपयांमध्ये देण्याचे वाटप स्वस्त धान्य दुकानांमध्ये सुरू झालं आहे. आज नेवरी (ता कडेगाव) येथील सर्व सेवा सोसायटीच्या संलग्न असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानामध्ये या आनंदाचा शिधा किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय विभूते, सरपंच मोहन सूर्यवंशी, उपसरपंच अरुण महाडीक यांच्या हस्ते प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना या किटचे वाटप सुरू करण्यात आले. यावेळी सोसायटी व्हा चेअरमन दत्तात्रय महाडीक रामचंद्र गुरव,युवराज महाडीक, स्वस्त धान्य दुकानदार सूर्यकांत देसाई यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.


